शनिवार, ४ एप्रिल, २०१५

शेवंता.....


शेवंता म्हणजे अजब रसायन होतं. लिंबाच्या बुंध्यागत भरल्या अंगाची ठसठशीत बाई ! गाजरासारखा रंग अन नितळ काया. अंगणात बसली तर केळीच्या खोडासारख्या तिच्या तराट गोर्‍यापान पिंडर्‍याकडे जादू झाल्यागत नजर जायचीच. तटतटलेल्या पायावर रंगीत घुंगरांचे सैलसर चांदीचे पैंजण उगाच चाळा करत रहायचे अन बघणारा गपगार व्हायचा. काजळ घातलेल्या तिच्या पाणीदार मोसुळी डोळ्यात सदोदित एक आवतण असायचं. मोठ्या कपाळावर आडवी रेष अन त्यावर बारीक गोलाकार गंध असायचा. जो तिच्या उभट चेहऱ्याला फारच खुलून दिसायचा. कानातले लंबुळके झुबे सतत डुलत रहायचे. ओठाच्या पाकळ्या उघडल्या की पांढर्‍याशुभ्र मोगर्‍याच्या कळ्यासारख्या दंतपंक्ती बेचैन करत. क्वचित कधी ती मोकळया केसानिशी उभी असली की अजूनच जालीम दिसायची. बहुतकरून सैलसर अंबाडा बांधून त्यावर तिने एखादा गजरा माळलेला असायचा. गळ्यात मोहनमाळ आणि काळ्या मण्यांची सैलसर बारीक सोनेरी तारेतली सर असायची. पाठीवर लाल रेशमी गोंडा असणारी ही काळी सर तिच्या गळ्यावर अशी काही रूळायची की समोरचा सतत तिच्या भरदार छातीकडे चोरून बघायचाच. आवळ पोलके नेसल्यानं गच्च दंडावर करकचून बांधलेल्या काळ्या दोर्‍यातली बारीक काळपट पितळी पेटी अधिकच चेमटलेली वाटायची. तिच्या गुटगुटीत मनगटालाही काही दोरे गुंडाळलेले असायचे. लुसलुशीत पोटाला बांधलेली चांदीची साखळी अन दुहेरी गुंफलेला कटदोरा इतका घट्ट असायचा की कधीकधी तिच्या पोटाच्या कोपऱ्यावर लालसर वळ दिसायचे. तिचं सारं अंगांग गाभूळल्या चिंचेसारखं होतं, बघणार्‍याच्या तोंडालाच लाळ सुटायची.

वेशीबाहेर गावकुसाच्या उजव्या अंगाला असणार्‍या आमराईत केकताडाच्या कोपर्‍यात तिचं खोपटवजा घर होतं. लिंबाच्या आढ्यावर माळवद अन एकाआड एक अशा दोन खोल्या. आजूबाजूला फुलांची झाडं. अंगण सदा लख्ख सारवून त्यावर रांगोळी काढलेली असायची. घरात कसला तरी तरतरीत वास असायचा. दरवाजे नेहमी अर्धउघडे असत. तिच्या अंगणात तुळसही होती. एखाद्या सकाळी तिच्या घरातून देवपूजेची घंटी वाजवल्याचा आवाज यायचा. तिच्या घराकडे जाणारी एक पायवाट आमराईतून दिसायची. गावातल्या माणसांसह पंचक्रोशीतली मंडळी अधूनमधून तिथं घुटळायची, गुळाच्या ढेपेवर असणार्या माशागत तिथंच मागपुढं फिरायची. दिवसा क्वचितच कुणीतरी तिच्या घरात आतबाहेर करायचा, पण अंधारून आल्यावर मात्र तिच्या घराकडं चोरून जाणारे वारेमाप होते. पण या सर्वांना अपवाद होता बापू रावताचा. बापू राऊत. खात्या पित्या घराचा, घरी बायकोपोरं असलेला गडी. खाटकाच्या दुकानापुढं एखादं हडकुळं कुत्रं बसलेलं असावं तसा तो सदानकदा तिच्या अंगणात पडीक असायचा. बिड्या ओढून आणि 'नवसागराची' पिऊन त्याच्या अंगाचे पार चिपाड झालेलं. मळकं धोतर, पिवळट सदरा, डोईवरची तेलकटलेली टोपी अशा वेशात तो तिथंच आंदण दिल्यागत राहायचा.

शेवंतेच्या घरी वाण्याचा म्हातारा गडी किराणा माल घेऊन आला की आशाळभूत नजरेनं तिला न्याहळत बसायचा. तिची प्रत्येक हालचाल अधाशागात बघत रहायचा. तिच्या हातचा चहा घेऊपर्यंत तिथून हलत नसायचा. पैसे देण्यासाठी तिनं पोलक्यात हात घातला की त्याचा जीव खालीवर व्हायचा. मग बापू राऊत त्याच्यावर खेकसायचा. कधी कधी कापडी गोणीत साड्या घेऊन तिच्या घरी तालुक्याहून काही व्यापारी यायचे. उनाड वांड पोरे तिला काही चीज वस्तू आणून देत. शेवंताचा आवाजही तिच्याच सारखा मधाळ होता. तिनं काहीही गुणगुणलं तरी कानाला गोड लागायचं.

अलीकडल्या काही दिवसात अण्णा पवारांचा गजा रात्री बेरात्री तिच्या घराभवती दिसू लागला होता. गजा म्हंजे नुकतेच मिसरूड फुटलेला तरणाबांड देखणा पोर. लालबुंद रंगाचा पिळदार अंगाचा गजा हा अण्णा पवाराचा धाकला पोर. शेवंतेच्या घराभवती त्याच्या घिरट्या वाढल्यावर थोड्याच दिवसात कुणी तरी अण्णांच्या कानात कुजुबुजलं. ते ऐकताच डोक्याचा फ्यूज उडालेल्या अण्णांनी गजाला चाबकाने सोलून काढला. इस्तवाच्या डोळ्याचा अण्णा पवार हा अगदी कडक अन रग्गील होता. त्यानं या आधीही शेवंतेला गावातून हाकलून देण्याचे प्रयत्न केले होते पण रंगेल सरपंच अन पाटलापुढं त्यांचं काहीच चाललं नव्हतं. काही दिवसातच त्यांनी गजाला शिक्षणासाठी म्हणून त्यांच्या बहिणीकडे दूर शहरात पाठवलं. तसं बघितलं तर गजा आणि शेवंता यांच्यात दहाएक वर्षांचे तरी अंतर होतं. त्यांच्यात तसं काही वेगळं नातं निर्माण होईल अशी कुठलीच चिन्हं नव्हती. पण अण्णाच्या करारी स्वभावापुढं कुणाचंच काही चाललं नाही.

गजा गावातून गेला तसा शेवंताचा चेहरा फिक्कट पडला. काही दिवस गेले आणि एका मध्यरात्री बापू रावताची बायको तिच्या न्हात्याधुत्या झालेल्या तिन्ही पोरी आणि एकुलत्या पोरासह शेवंताच्या घरी आली. त्या रात्री तिच्या रडण्याचा आवाज दूरवर येत होता. काही वेळानं फाटक्या पदराने डोळे पुसत ती शेवंताच्या घराबाहेर आली. निघताना तिथल्या अंगणात पडलेल्या आपल्या नवर्याच्या गळ्यात पडून धाय मोकलून रडली. ती रडताना शेवंतीचे डोळेसुद्धा पाण्यानं डबडबले. या घटनेनंतर दोनच दिवसात शेवंता घर सोडून गेल्याची बातमी गावभर पसरली. गावातल्या बायका खुलेआम तिची चर्चा करू लागल्या. वर्षातला एकच दिवस वगळता शेवंता वेस ओलांडून गावात कधीच येत नसायची. नवरात्रीतल्या सातव्या माळेलाच ती गावात देवीच्या दर्शनाला यायची. देवीची खणा नारळाने ओटी भरून जायची. त्या दिवशी डोईवरून पदर घेऊन खाली नजर ठेऊन संथपणे चालत जाणारी शेवंता दिसली की पाहणारे दिग्मूढ होत. स्त्रियाही याला अपवाद नसत. तिने लावलेलं अत्तर, तिने नेसलेली साडी चोळी आणि तिच्या दागदागिन्यावरुन बायकांच्या पाणवठ्यावरल्या गप्पा पानविडा रंगाव्या तशा रंगत.

अशीच काही वर्षे अबोल गेली. एके दिवशी पवारांचा गजा गावात परत आला. त्याची पार रया गेली होती, "शिक्षण काय झालं नाय, पण प्वार वाया गेलं" असं गावातली माणसं त्यांच्याकडे बघून बोलू लागली. डोक्यावर परिणाम झालेलं ते तरणंताठं पोर सदा मळ्यात एकांतात राहू लागलं. त्याच्याकडे बघवत नव्हतं. इकडं शेवंताचं अंगण भकास झालं होतं. सार्‍या पडवीत पालापाचोळा साठला होता. फुलझाडं जळून गेली होती, त्यांची वठलेली काडीकामटी शिल्लक होती. तिच्या अंगणातलं लिंबाचं झाडही निष्पर्ण होऊन गेलं होतं. भवताली केकताडांची दाटी झाली होती. ती गेल्या पासून आमराईला बहर तो कसला आलाच नव्हता. मधल्या काळात बापू रावताच्या तिन्ही पोरींचे लग्न उरकलं. बायको अन नुकताच हिरवा होऊ लागलेला पोरगा त्याचं शेत कसत होते. बापू रावतानं मात्र अंथरूण धरलं होतं.

वैशाखाच्या एका धगधगत्या दुपारी अण्णांच्या गजानं त्यांच्या वस्तीतल्या लिंबाच्याच झाडाला गळफास घेऊन जीव दिला. सारं गाव हळहळलं. त्याच्या बहिणींच्या आणि आईच्या आक्रोशानं सारी सृष्टी जणू बधिर झाली. त्याचं क्रियाकर्म झालं. काही दिवसातच लोकांना त्याचा विसर पडला.
मात्र पुढच्याच चांदपुनवेच्या रात्री शेवंतेच्या अंगणात लगबग दिसली. ती परतली होती. घरी आल्यावर तिनं काही सगळं अंगण साफ केलं नाही. थोडा पालापाचोळा सांदाडीत लोटला. सकाळ होताच शेवंता परत आल्याची बातमी गावभर झाली. ती आली खरी पण तिचं चैतन्य हरवलं होतं. तिचा जोशही ओसरला होता. काया पिवळट पडली होती. ती आलेल्या दिवशीच दुपारी वाण्याने धाडलेला नवीन गडी तिच्या घरी गेला. पण नेहमी अर्धवट उघडं असणार्‍या घराची दारं पूर्ण बंद होती. त्याने तिच्या नावाच्या हाळया दिल्या. बर्‍याच वेळानं दार किंचित किलकिलं झालं. तिने आतूनच किराणा सामान नको असल्याचं त्याला सांगितले. तो हात हलवत निराश होऊन गावात परतला. शेवंतीला पाहता न आल्याची खंत त्याच्या पोरसवदा चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.

तो दिवस फार जड गेला. सूर्य लवकर मावळलाच नाही. अखेर रात्र झाली. शेवंताच्या घरात बारीक तेवत असलेला कंदील हळूहळू धुसर झाला. भल्या पहाटे मात्र आमराईत आवाजाचा गलका उठला. शेवंताचं घर जळत होतं. तिच्या अंगणातला निष्पर्ण लिंब धडाडून पेटला होता. सारा पालापाचोळा रणरणला होता. काही वेळातच तिच्या घराच्या आढ्याचे वासे पेटले अन धाब्यासह तिचं खोपट कोसळलं. सार्‍या आसमंतात धूरधुराळा उडाला. तिच्या घरालगत दूरपर्यंत कोणाचीही वस्ती नसल्यानं आग विझवायला लवकर पाणीही मिळालं नाही. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. आरसपानी अंगाची शेवंता त्या धगीत राख होऊन गेली पण तिच्या ओरडण्याचा साधा आवाज देखील आला नाही. दुसर्‍या दिवशी बापू रावताच्याच पोरानं आधीच जळालेल्या देहाला तिच्या अग्नी दिला. घर जळालं की तिने जाळलं हे कोडं कधी सुटलंच नाही ती मात्र मुक्त झाली.

आता कित्येक दिवस लोटलेत. तिची ती जळालेली ओसरी आता अगदीच भयाण झालीय. तिकडे आता कुणीही फिरकत नाही. मला मात्र कधी कधी त्या आमराईच्या कोपर्‍यात डबडबलेल्या डोळ्याने उभा असलेला गजा दिसतो तर कधी करपलेल्या नजरेने डोळ्यात पाणी आणून कोणाची तरी वाट पाहत उभी असणारी रडवेली शेवंता दिसते. त्यांना पाहून मी कावराबावरा होतो. डोळे पुसत तिथून घरी परत येतो. बालवयात शेताला जात असताना मला खास बोलवून घेऊन तिने रुमालात बांधून दिलेली गोड शेवकांडी किती तरी दिवस मी घरात कुणालाही न दाखवता लपवून ठेवली होती. अजूनही त्या रुमालात तिच्या हाताचा हवाहवासा वाटणारा गंध दरवळतो.

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा