गुरुवार, २८ एप्रिल, २०१६

राणी चेन्नम्मा असीम शौर्याची धीरोदात्त स्त्री ....



आपल्या सर्वांना झाशीची राणी आणि तिचे असीम शौर्य याविषयी माहिती आहे पण तिच्या कालखंडाहून आधी व तिच्याइतकेच शौर्य- धैर्य यांचे अलौकिक प्रदर्शन करून इंग्रजी सत्तेविरुद्ध शस्त्र उचलणारया पहिली सशस्त्र स्त्री क्रांतिकारक चेन्नम्माविषयी फारशी माहिती बहुधा नसते. १८५७च्या बंडाच्या ३३ वर्षे आधी एका स्त्रीने केलेला हा रक्तरंजित संघर्ष खरे तर भारतीय इतिहासातील स्वातंत्र्य संग्रामाच्या गाथेतील एक सोनेरी पान आहे पण आमचे दुर्दैव असे की बहुतांश लोकांना त्यांचे कार्य आणि शौर्य याबाबत अनभिज्ञता आहे. बहुधा झाशीच्या राणीचे 'मराठी'पण आणि अलीकडील काही दशकातील कन्नडिगांप्रतीचा राग याचीही झालर या अनास्थेमागे असू शकते..

कित्तूरचा किल्ला
धुलप्पा आणि पद्मावती या दांपत्याच्या पोटी कर्नाटकातील काकती या छोट्याशा जन्माला आलेली कन्या पुढे कित्तूरचे संस्थानिक मल्लसर्जा देसाई यांच्याशी विवाहबद्ध झाली, आणि ती झाली राणी चेन्नम्मा! परकीय सत्तेला क्रांतीच्या ज्वालांचा अनुभव देणारी ही पहिली भारतीय स्त्री ! त्या राणी चेन्नम्मांचा आज जन्मदिन आहे. चेन्नम्मा ही जशी कन्नड, संस्कृत, मराठी आणि उर्दू भाषांची जाणकार स्त्री होती तशीच ती एक तेजस्वी रणरागिणी होती यातून तिचे वेगळेपण लक्षात यावे...

आजच्या काळात तर कित्तूरची राणी चेन्नम्माचे शौर्य एखाद्या दंतकथेसारखे बनून राहिले आहे ! आजच्या दिवशी १८२९ साली मृत्युमुखी पडलेली राणी चेन्नम्मा, भारतातली सगळ्यात पहिली स्त्री स्वातंत्र्यसैनिक होय. जेव्हा पुण्यात पेशवे राज्य करत होते, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जन्मही झाला नव्हता तेव्हा चेन्नम्मा ब्रिटीशांशी लढा देत होती. राणी चेन्नम्माचा इतिहास जितका वीररसाने ओथंबला आहे तितकाच कित्तूर या छोट्याशा संस्थानाचा इतिहास देखील रंजक आहे. राज्यविस्ताराची आस लागून राहिलेले दूरदृष्टीचे पेशवे आणि चिवट टिपू सुलतान यांच्यातील संघर्षाची रस्सीखेच या संस्थानाशी निगडीत असूनही मराठी इतिहासकारांनी चेन्नम्मेच्या दिव्य इतिहासावर तितके लेखन केलेले नाही असे आढळून येते.

कर्नाटकातील कित्तूर हे आजचे शहर बेळगांव जिल्ह्यातील संपगांवच्या दक्षिणेस सुमारें ७ कोसांवर अंतरावर आहे. येथें बसवेश्वराचे एक प्रसिद्ध देऊळ आहे त्यांत इ.स. ११८८ सालचा गोव्याचा राजा जयकेशी तिसरा याच्या वेळचा एक शिलालेख आहे. या शिलालेखांत कित्तूरच्या एका देवस्थान जमीनीच्या भांडणाचा निकाल कोरला आहे.या शिलालेखांत कित्तूर या गांवाचा उल्लेख प्रथम आलेला आहे. इ. स. १५३४ साली कित्तूर गांव बेळगांवच्या असदखानाचा नोकर युसफखान नांवाच्या तुर्क सरदाराला जहागीर होता. सोळाव्या शतकाच्या अखेरीस विजापूरकरांच्या सैन्याबरोबर हिरेप्पा आणि चिकाप्पा नांवाचे मल्ल आडनांवाचे दोन लिंगाइत भाऊ सावकारी करण्याकरतां या भागांत येऊन संपगांवास राहिले. कित्तुरकर देसायांचे हेच मूळ पुरुष होत. या दोघा भावांपैकी हिरेप्पानें रणांगणावर मोठें शौर्य दाखविल्यावरून त्यास हुबळी परगण्याची सरदेशमुखी व समशेर-जंग-बहादुर हा किताब मिळाला. या कुळांतील पांचवा देसाई कित्तूर येथें स्थायिक झाला. संपगांव व बिडी हीं दोन ठाणींहि त्यांच्याच ताब्यांत होतीं. सतराव्या शतकाच्या अखेरीस सार्‍या कर्नाटकांत कित्तूरकर मुडी(मुददी) मल्लप्पा देसाई हाच प्रख्यात देसाई होता.

सावनूरचा नबाब रौफ खान यानें कित्तुरच्या देसायांशी जे करारमदार केले त्यावेळी हाच मुडी मल्लप्पा देसाई होता. इ. स. १७४६ सालीं सावनूरच्या नबाबास इतर मुलुखाबरोबर कित्तुर मराठ्यांच्या स्वाधीन करावें लागलें. इ.स. १७७८ साली हैदरानें खंडणी व इतर नजराणा देण्याच्या कबुलीवर हा मुलूख कित्तुरकरांकडे ठेवण्याचे कबूल केले. इ. स. १७५६ सालापासून परसगड, संपगांव व बिडि हे परगणे कित्तुरकर देसायांकडे चालत आले होते. इ. स. १७७८ सालीं त्यांनीं गोकाक ताब्यांत घेतलें. परंतु इ.स. १७७९ सालीं परशुरामभाऊंनीं गोकाक सर केलें व देसायांस कैद केले. इ. स. १७८५ सालीं टिपूने कित्तुर, नरगुंद, रामदुर्ग वगैरे काबीज करून कित्तुर येथें आपली एक सैन्याची तुकडी ठेवली होती. पुढे टिपूचा नाश करण्याकरता मराठे व निजाम हे एकत्र झाले असता त्यांनी कित्तुर येथे टिपूच्या बुर्‍हाणुद्दीन नावाच्या सरदारावर गणेशपंत बेहेरे व तुकोजी होळकर यांच्या हाताखालीं २५ हजार सैन्य देऊन पाठविलें. त्यांनी सार्‍या प्रांतांतून टिपूच्या सैन्यास हाकलून दिलें. तथापि काहीं काळ कित्तूरचा किल्ला टिपूच्या ताब्यात होता. पुढें इ. स. १७८७ साली टिपूस कित्तुर व इतर प्रदेश मराठ्यांच्या हवाली करावा लागला.

जेंव्हा १७८५ ते १७८७ अशी सलग तीन वर्षें हे संस्थान टिपू सुलतानच्या ताब्यांत होतें. त्यावेळीं तेथील देसायांच्या जहागिरीचा सर्व कारभार टिपूचा सेनापति बद्र-उल्-झमान हा पहात असे. देसायांस फक्त काही रक्कम तनख्यादाखल खर्चास मिळे. इ. स. १७९२ साली झालेल्या श्रीरंगपट्टणच्या तहान्वयें पूर्वीं टिपूच्या राज्यांत मोडणार्‍या कित्तूरच्या देसायांचा हा प्रदेश पुन्हा मराठ्यांकडे आला. तो पुढें पेशवे दरबारनें परशुरामभाऊ यांना सरंजामांत लावून दिला. भाऊनी कित्तुरास आपला एक मामलेदार ठेवून ते ठाणे धारवाड सुभ्यांत दाखल करून तेथील देसायांस बेगमीस नेमणूक करून दिली. खरे तर या देसायांनीं मराठ्यांनां अतोनात त्रास दिला होता. मरांठ्यांचे शत्रू जे हैदर व टिपु त्यांना हे मराठ्यांच्या विरुद्ध नेहमी मिळत व मराठ्यांच्या मुलुखांत आवडाव करीत असत म्हणून पेशवे दरबारी ही बेगमीच्या स्वरूपाची योजना या समस्येसाठी आखली गेली. इ. स. १८०० साली धोंड्या वाघाने मराठ्यांचे एक सेनानी धोंडोपंत गोखले यांच्या पिछाडीवर कित्तुरजवळ आकस्मिक छापा घातला व धोंडोपंतास ठार मारलें. याच धोंडोपंतांनी इ. स. १७९१ साली धोंड्या वाघास पराजित केले होतें. कित्तुर परगणा धोंड्या वाघाच्या ताब्यांत बरेच महिने होता.

२३ ऑक्टोबर १७७८ ला जन्मलेल्या काकतीच्या चेन्नम्मेस कित्तूरची राणी होण्यापूर्वीच लहानपणीच लोक तिच्या बहादुरीमुळे ओळखायचे. बालवयातच घोड्यावर बसणे, तलवार चालवणे, तिरंदाजी अशा त्याकाळच्या युद्धकलेतच्या महत्त्वाच्या अंगांचे शिक्षण तिने घेतले. नंतर कित्तूरचे राजा मल्लसर्जा देसाई यांच्याशी तिचा विवाह झाला. मल्लसर्जा देसाईचे चेन्नम्माशी लग्न होण्यापूर्वी रुद्राम्माशी पहिले लग्न झाले होते. रुद्रम्मापासून त्याला शिवलिंग हा मुलगा झाला होता. रुद्रम्माच्या पश्चात चेन्नम्मेचा विवाह मल्लसर्जाशी झाल्यावर तिला त्याच्यापासून एक मुलगा झाला पण त्याचा लवकरच मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर अल्पावधीतच राजा मल्लसर्जाचेही निधन झाले, पोटचा मुलगा आणि पती यांचे निधन झाल्यावर चेन्नम्मेने हार न मानता तिचा सावत्र मुलगा शिवलिंग याला गादीवर बसवून त्याचा राज्याभिषेक करून दिला. पण दुर्दैवाने दिवस फिरले, शिवलिंगाचाही १८२४ साली मृत्यु झाला आणि इंग्रजांना कित्तूरचं राज्य घशात घालण्याची कधीपासून हवी असलेली संधी मिळाली.

एका नोंदीनुसार इ. स. १८०२ साली कित्तुरकर मल्लसर्जा देसायाच्या ताब्यात कित्तूर सभोवतालचा सालीना चार लाख रुपये उत्पन्नाचा मुलूख असताना ते सालीना पेशव्यांस ६० हजार रुपये खंडणी देत असत. याच वर्षी जनरल वेलस्ली श्रीरंपट्टणाहून पुण्यास बाजीराव पेशव्यांच्या मदतीस जात असता या देसायांनी त्यास मदत केली होती. त्यामुळें त्यांचा सरंजाम कायम राहिला. इ. स. १८०९ साली या देसायांस पेशव्यांनी पुण्यास बोलविलें होतें .त्यावेळीं झालेल्या ठरावान्वयें त्याची जहागीर त्याच्याकडे रहावी असे ठरलें व त्यास `प्रतापराव’ हा किताब देण्यांत आला. याजबद्दल देसायांनीं पेशव्यांनां सालीना एक लाख, पांच हजार रुपये खंडणी द्यावी असे ठरले. प्रतापराव किताब मिळाला याच्या स्मरणार्थ देसायानी नंदगडाजवळ प्रतापगड नावाचा एक किल्ला बांधला. याच नीतीचा भाग म्हणून कित्तूरच्या राजांकडेही इंग्रजांचे तैनाती सैन्य होतं. अशा प्रकारे इंग्रज तिथे चंचूप्रवेश करून मोकळे झाले होते. आता कित्तुरानजीक येऊन ठेपलेल्या इंग्रजांना शिवलिंगाचा मृत्यू ही नामी संधी वाटल्यास त्यात नवल ते काय !

पण चेन्नम्मा इंग्रजांना बधली नाही. तिने शिवलिंगप्पाच्या पश्चात त्याच्याच नात्यातील गुरुलिंग मल्लसर्जा याला दत्तक घेतले आणि त्याचा विधिवत राज्याभिषेक केला. ब्रिटीशांनी तिचे दत्तकपत्र नामंजूर करून कित्तूर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. चेन्नम्माला बाहेरच्या लोकांचा हा प्रयत्न मान्य नसल्यामुळे तिने लढण्याची पूर्ण तयारी केली. ब्रिटीशांच्या प्रचंड फौजफाट्याला न घाबरता तिने बंडाळी करून स्वत:चं सैन्य उभं केलं. २३ ऑक्टोबर १८२४ च्या लढाईत संस्थान खालसा करणारा, धारवाडचा तेव्हाचा कलेक्टर थॅकरे, चेन्नमेच्या सैन्याने मारला. चेन्नमेची ही लढाई मात्र फार काळ चालली नाही. दिड महिन्यांच्या आतच, ३ डिसेंबर १८२४ला चन्नमा पकडली गेली. कित्तूरचे राज्य बेळगाव जिल्ह्याला जोडले गेले. आणि युद्धबंदी बनवून चेन्नमेला बैलहोनंगळच्या किल्ल्यात पाठवलं आणि तिथेच तिचा २१ फेब्रुवारी १८२९ साली मृत्यु झाला. कित्तूर संस्थान खालसा केले. यावेळी इंग्रजांनी किल्ल्यांत जी लूट केली तींत १६ लक्ष रुपये रोख व ४ लक्षांचें जवाहीर, पुष्कळ घोडे, एक हजार उंट, कित्येक हत्ती, ३६ तोफा, पुष्कळ बंदुका, तरवारी व दारू गोळा वगैरे बराचसा माल होता.

राणी चेन्नम्माच्या पश्चात इ. स १८२९च्या उत्तरार्धात सांगलीच्या रायाप्पा पाटलानें देसायांच्या दत्तक मुलास पुढें करून पुन्हां बंड उभारलें परंतु लवकरच त्याचाहि मोड करण्यात आला. पहिल्या बंडात रायाप्पा सामील होता. त्यासाठी त्याच्या इनाम जमीनी इंग्रजांनी जप्त केल्या होत्या; हें बंडाचें कारण होतें. रायाप्पाच्या सोबत्यांनींच फितूर होऊन त्याला इंग्रजांच्या स्वाधीन केलें

बेळगावपासून ५० किमीवर कित्तूरचा किल्ला आजही चेन्नम्मांची कहाणी सांगत उभा आहे. आपल्या हक्कासाठी, आपल्या जनतेसाठी लढणारी चेन्नम्मा ही आज फक्त कर्नाटकातच नाही तर सगळ्यांसाठीच वीरश्रीचा एक धगधगता अंगार होता, आजदेखील हा सर्व मुलुख तिच्या शौर्याच्या खुणा अंगावर अभिमानाने मिरवत तिच्या जाज्वल्य देशभक्तीची ग्वाही देत ताठ मानेने उभा आहे...

११ सप्टेबर २००७ मध्ये देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती सौ.प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते संसदभवनाच्या प्रांगणात राणी चेन्नम्मा यांच्या दिमाखदार पुतळ्याचे अनावरण झाले. एका रणरागिणीची योग्य दखल घ्यायला आपल्या देशाला स्वातंत्र्यानंतर ६० वर्षे का लागावीत हा देखील सर्वंकष आत्मचिंतनाचा मुद्दा आहे .....

राणी चेन्नम्माच्या धीरोदात्त अन अजोड शौर्यगाथेस त्रिवार प्रणाम....

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा