शनिवार, १ ऑक्टोबर, २०१६

दोन पावले मागे सरलेला 'वाघ' ...


आज उद्धव ठाकरेंनी केलेले काम संजय राऊत यांनी सामनामधून वेळीच केले असते तर आज ही वेळ शिवसेना पक्षप्रमुखांवर आली नसती..
संजय राऊत यांनी वादग्रस्त व्यंगचित्र छापून आल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशीची प्रसिध्द केलेली बातमी मराठा समाजाला त्या व्यंगचित्रापेक्षाही क्लेशदायक वाटल्याचे अनेक जणांच्या विचारांतून जाणवले.
सामना / संजय राऊत यांनी माफी मागून जे काम सहज शक्य होते ते त्यांनी केले नाही.


पण बुडत्याचा पाय खोलात या नात्याने संजय राऊत नामानिराळे होतात आणि शिवसेनेला तोंडावर पाडतात हे मागील सहा - सात वर्षात खूप वेळा घडले आहे.
ज्या शिवसेनेने भल्या भल्यांना घाम फोडला,अनेक गर्विष्ठ माना झुकवल्या त्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर ही वेळ आणण्यास सर्वस्वी संजय राऊत हेच जबाबदार आहेत.

उद्धव ठाकरेंनी माफी मागताना अत्यंत सूचक व योग्य शब्द वापरले आहेत. त्यांनी वाघ दोन पाऊले मागे जाऊ शकतो हे दाखवून दिले आहे. दोन पावले मागे सरलेला हा वाघ कोणाची शिकार करणार व कधी करणार हे बघण्यासारखे असेल.
कुणी याला नामुष्की म्हणत असेल तर त्याचा तो अपरिपक्वपणा म्हणावा लागेल. एक प्रकारची राजकीय सुज्ञता दाखवताना उद्धव ठाकरेंनी याच पीसी मध्ये मराठा आरक्षणावर आणखी तीव्र व कठोर भूमिका मांडत त्यांच्या जबड्यात कोण अडकणार आहे याचे सुतोवाच केले आहे.
उद्धव ठाकरेंनी मागितलेल्या विनम्र माफीचा आधार घेऊन कुणी उन्माद दाखवत असेल वा विजयी वीराचा आव आणून छाती पिटत असेल तर तो जिजाऊ मा साहेबांचा मराठा नाही, कारण उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील तमाम माताभगिनींची ही माफी मागितली आहे, कुणा संघटना वा जात वा नेत्याच्या अनुषंगाने ती नाहीये.

तेंव्हा या माफीवर उन्माद दाखवणारया माणसाने 'त्या व्यंगचित्राने आपल्या भावना दुखावल्या' हा दावा जर आधी केला असेल तर त्याच्यासाठी तो केवळ आणि केवळ कांगावाच ठरतो. कारण ही माफी आपल्याच माय भगिनींच्या भावनांसाठी आहे अन त्यावर उन्माद करणारा हा अधिक धोकेदायक ठरतो.
व्यक्तीशः अनेक लोकांना उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेचे शल्य वाटेल, खासकरून शिवसैनिकांना वाईट वाटेल. मला सुद्धा काही क्षण ही माफी खटकली. वास्तविक पाहता 'मोडेन पण वाकणार नाही' या बाण्याने मराठी माणसाचे अपरिमित व्य्वाहारिक नुकसान केले आहे याची जाणीव ज्या ज्या माणसाला असेल त्या त्या प्रत्येक व्यक्तीस यातला सुज्ञपणा लक्षात येईल. त्यामुळे एका माफीने शिवसेनेला वा सेना नेतृत्वाला कमीपणा न येत नसून आपण असले अत्यंत कडूचवीचे विखार हसतमुखाने पचवू शकतो हे दाखवून दिले आहे.  उद्धव ठाकरेंचा हा राजकीय प्रगल्भपणा काही लोकांच्या डोळ्यात ठसठसेल पण त्याला इलाज नाही, कारण शेवटी आपण बाजी पलटी करूनही बाजी मारू शकतो हे त्यांना दाखवून द्यायचे असेल. शिवाय घोडामैदानही योगायोगाने जवळ आलेलेच आहे.

दोन पावले मागे सरलेला वाघ हा दबा धरून बसलेल्या वाघापेक्षा जास्त धोकादायक असतो असे जाणकार सांगतात. उद्धव ठाकरेंच्या डोक्यात नेमके काय चालले असेल याचा अचूक वेध शब्दशः घेणे अशक्य आहे मात्र एक नक्की आहे, की या खेळीचा त्यांना दूरगामी फायदाच होणार आहे. त्यांनी ही खेळी करून अनेकांना बुचकळ्यात टाकताना आपली पुढची खेळी काय असेल यासाठी नेल बाईटींग सस्पेन्स तयार केला आहे हेही तितकेच खरे ...

'सामना'' मध्ये लिहिताना वा इतरत्र बोलताना संजय राऊतांनी इथून पुढे तारतम्य बाळगले तर सेनेस त्यांचा उपयोग नसला तरी त्रास तरी होणार नाही. त्यांचा अति आवेश व आततायीपणा त्यांना व पर्यायाने सेनेला नडतो ..यावर उपाय त्यांनीच शोधायचा आहे. आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने संजय राऊत यांचा वाईट दिवस असेल. शिवसेनाप्रमुख गेल्यावर जितके वाईट त्यांना वाटले असेल तितकेच शल्य त्यांना आज जाणवत असणार आहे. कारण तेही हाडाचे कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांनी आज आत्मचिंतन करावे असा हा दिवस आहे.

असो... ही सर्व माझी वैयक्तिक भूमिका आहे, ती सर्वाना पटावी असा आग्रह नाही.

सूचना - सदर पोस्टवर जातीवाचक वा राजकीय वा व्यक्तिगत शेरेबाजी करून आपल्या संस्कारांचा पालथा घडा उघडू नये. 

- समीर गायकवाड.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा