गुरुवार, ५ एप्रिल, २०१८

काकाणी केस सलमान का हरला ?


बिश्नोई म्हणजे बीस आणि नऊ यांचे मिश्रण. वीस आज्ञा आणि नऊ तत्वे. गुरु जांभेश्वर यांनी समाजास ह्या २९ बाबींचे पालन अनिवार्य केले आणि हा समाज बिश्नोई म्हणून ओळखला जाऊ लागला. सलमान खानच्या काळवीट हत्या खटल्यात याच समाजाचे लोक फिर्यादी आणि साक्षीदार होते म्हणूनच तो ही केस हरला असे म्हणणे चुकीचे होणार नाही. कारण हा समाज प्राण्यांना देव मानतो, त्यातही जे गवत, पानं खाऊन जगतात ते यांना पूज्य आहेत. निसर्ग रक्षण आणि पर्यावरण संतुलन ही यांची आद्य कर्तव्ये आहेत. बिश्नोई समाजातील लोक हे प्रामुख्याने राजस्थानच्या थार वाळवंटाच्या परिसरात आढळतात. निसर्गाविषयी असलेल्या प्रेमासाठी त्यांची खास ओळख आहे. झाडे वाचवण्यासाठी काही वर्षापूर्वी आपल्याकडे चिपको आंदोलन झाले होते, नुकतेच गुगलने त्याची दखल घेत डूडलही बनवले होते. बिश्नोई समाजाने चिपको आंदोलनाहून श्रेष्ठ आणि गौरवशाली इतिहास अजमेरजवळील एका गावात घडवला होता. अमृतादेवी बेनिवाल या महिलेने आपल्या तीन मुली आणि पतीसह झाडे तोडायला आलेल्या राजा अभयसिंहाच्या सैन्यास विरोध केला आणि त्याकरिता प्राणाचे बलिदान दिले. ३६३ लोकांनी झाडांची कत्तल अडवण्यासाठी आपला जीव दिला होता. असं जगाच्या पाठीवर कुठंही कधीही घडलं नाही. इतकं कमालीचं निसर्गप्रेम या समाजात होतं, आहे आणि भविष्यातही राहील. इंटरनेटवर हरणाच्या पाडसाला आपलं दुध पाजणाऱ्या एका बिश्नोई स्त्रीचा फोटो व्हायरल झाला होता तेंव्हा समाजाने तिला नावं ठेवता तिची पाठराखण केली होती. सलमानच्या प्रकरणात त्याने सगळे प्रयत्न करूनही हा समाज बधला नाही की फुटलाही नाही.

शनिवार, ३१ मार्च, २०१८

अण्णांचे फसलेले आंदोलन..


कधी काळी लष्करी सैनिक असलेल्या आणि त्या नंतर ग्रामीण भागात सामाजिक प्रश्नांची नव्याने प्रेरणादायी उकल करणाऱ्या अण्णांनी पहिले आंदोलन १९८० मध्ये केले होते. गावास वेठीस धरणार्‍या प्रशासनाविरुद्ध गावातील शाळेला मान्यता मिळण्यासाठी अहमदनगर जिल्हा परिषदेसमोर अण्णांनी पहिले यशस्वी उपोषण केले. अण्णांनी एका दिवसातच यंत्रणेला झुकविले. अण्णांच्या सक्रिय सामजिक चळवळीच्या जीवनातला हा पहिला प्रसंग होता.

शनिवार, १७ मार्च, २०१८

रेड लाईट डायरीज - बायकांचे एस्कॉर्ट असेही ....



आपल्याकडे बायका पोरींना ‘धंद्याला’ लावणे वा त्यांची खरेदी विक्री करणे किती सहज सोपे आहे याचे हे आदर्श उदाहरण ठरावे. आपले कायदे किती कुचकामी आहेत आणि जी काही कलमं आहेत ती किती तकलादू आहेत हे यातून प्रकर्षाने ध्यानात यावे.

२००३ सालच्या ह्युमन ट्रॅफिकिंगच्या (अवैध मानवी तस्करी) एका खटल्यात पतियाळा येथील एका न्यायालयाने मार्च २०१८ मध्ये पंजाबी गायक दलेर मेहंदीला दोषी ठरवले. पोलिसांच्या कर्तव्य तत्पर शिताफीने आणि न्यायालयातील वकिलांच्या न्यायिक दलालीने आय मीन दलीलांनी हा खटला १५ वर्षे रखडवला गेला आणि शिक्षा झाली फक्त दोन वर्षे !

पत्रकारिता आणि राजकारण



काही दिवसापूर्वी काँग्रेस पक्षाने राज्यसभेच्या उमेदवारीसाठी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचे नाव घोषित केले आणि अनेकांनी भुवया उंचावल्या. कुमार केतकर हे मराठीतील प्रतिथयश पत्रकार, विचारवंत आणि लेखक म्हणून विख्यात आहेत. दैनिक 'लोकसत्ता'चे ते निवृत्त प्रमुख संपादक होत. तसेच 'महाराष्ट्र टाईम्स' आणि 'लोकमत' या वृत्तपत्रांचे माजी मुख्य संपादक होते. 'डेली ऑब्झर्व्हर'चे निवासी संपादक तसेच 'इकॉनॉमिक टाइम्स'चे विशेष प्रतिनिधी म्हणूनहूी कुमार केतकरांनी काम केलेले आहे. संपादकपदाच्या कारकिर्दीत ते अखेरीस 'दैनिक दिव्य मराठी' वृत्तपत्राचे मुख्य संपादक होते. राज्यसभेच्या उमेदवारीचा हा निर्णय अनपेक्षित नव्हता तसेच ही वाटचालही इतक्या सहजासहजीची नव्हती. काँग्रेसमधील अन्य इच्छुकांनी  यावर दबक्या आवाजात चर्चा आरंभण्याचा प्रयत्न केला तर काहींनी सोशल मिडीयावर नाराजी व्यक्त केली. नेहमीप्रमाणे काँग्रेसने याची काडीमात्र दखल घेतली नाही. कुमार केतकर यांच्या नावाला राहुल गांधींनीच पुढे आणल्याने यावर व्यक्त होणे काहींनी शिताफीने टाळले. काही ज्येष्ठ निष्ठावंत काँग्रेसजनांनी मात्र या निर्णयाचे स्वागत करत केतकर यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्वाचा, भाषाप्रभुत्वाचा, पत्रकारितेतील वर्तुळातील अनुभवाचा आणि चौफेर व्यासंगाचा चांगला उपयोग होईल अशी प्रतिक्रिया दिलीय. अन्य राजकीय पक्षांनी यावर सावध प्रतिक्रिया दिल्या तर पत्रकार जगतातून अनेकांनी या निर्णयासाठी काँग्रेस आणि केतकर यांचे अभिनंदन केले. इथेही काहींनी नाराजीचा सूर आळवण्याचा प्रयत्न केला पण त्याला फारसे यश लाभले नाही. या निर्णयाची सोशल मिडीयाच्या सर्व अंगांवर रंगतदार चर्चा पाहावयास मिळाली. काहींनी टवाळकी केली, काहींनी पाठराखण केली तर काही नेहमीप्रमाणे तटस्थ राहिले. तरीदेखील एक मोठा वर्ग असा आढळून आला की जो या घटनेच्या आडून पत्रकार आणि त्यांचे राजकारण व पत्रकारांच्या राजकीय भूमिका यावर टिप्पण्या करत होता. ही संधी साधत अनेकांनी सकल पत्रकारांना दुषणे दिली. काहींनी प्रिंट मिडीया आणि इलेक्ट्रॉनिक मिडीया याची गल्लत करत पत्रकारांवर हात धुवून घेतले. पत्रकारांनी राजकारणात जाऊ नये असा धोशा या लोकांनी लावून धरलेला होता. वास्तविक पाहता ही काही पहिली घटना नव्हती की लोकांनी इतकी आदळआपट करावी. अशा घटना या आधी राज्यात,देशात आणि जगभरात अनेक ठिकाणी घडल्या आहेत.

बुधवार, १४ मार्च, २०१८

रेड लाईट डायरीज - झुबेदा




रेडलाइटमधली अर्धीकच्ची झुबेदा
एक हात चौकटीला लावून दाराच्या फळकुटाला टेकून
उभी असते तेव्हा
तिचे टवके उडालेले नेलपेंट आणि
पोपडे उडालेल्या भिंतीचा
लाल-निळ्या रंगाचा शिसारी काँट्रास्ट होतो.
कपचे उडालेली चौकट,
मोडकळीला आलेली कवाडे अन्

त्यावरचे खिळे उचकटलेले भेसूर कडी कोयंडे
मान मोडल्यागत शेजारीच लोंबकळत असतात.
तिच्या थिजलेल्या डोळ्यात
अधाशी पुरुषी चेहऱ्यांची अनेक प्रतिबिंबे दिसतात,
सत्तरीपासून सतरा वर्षापर्यंतची सर्व गिधाडे
घिरट्या घालून जातात
काहीतर चोची मारून घायाळही करून जातात.

मंगळवार, ६ मार्च, २०१८

स्तनत्यागिनी...


ज्येष्ठ प्रौढा, नाव - ज्युलिएट
फिट्ज पॅट्रिक. वयाच्या चोपन्नाव्या वर्षी जानेवारी २०१६ मध्ये त्यांच्या स्तनांच्या कर्करोगाचे निदान झाले. शेवटच्या टप्प्यातला कॅन्सर असल्याने स्तन काढून टाकण्याचा मास्टेक्टॉमी करण्याचा सल्ला त्यांच्या डॉक्टरांनी दिला. ते ऐकताच स्तन काढून टाकल्यानंतर आपण कसे दिसू आणि त्यावर काय उपाय केला पाहिजे याच बाबी त्यांच्या डोळ्यापुढे तरळल्या. आपले स्तन आपण रिकंस्ट्रक्ट करायचे का हा प्रश्नही त्यांच्या मनात उभा ठाकला. त्यांना तसा सल्लाही दिला गेला. कदाचित नेहमी ऍडमिट होणाऱ्या रूग्णांची तशी डिमांडही तिथल्या स्टाफने अनुभवली असावी. त्यामुळेच ज्युलिएटना देखील तोच सल्ला दिला गेला. शस्त्रक्रियेनंतर आपले स्तन पूर्वीसारखे दिसावेत आणि आपला स्त्रीत्वाचा लुकही तसाच असावा ही भावना त्यामागे असू शकते असं ज्युलिएटना वाटले. कारण स्तन ही स्त्रीत्वाची एक मुख्य खूणही आहे, तसेच तिच्या सौंदर्य लक्षणाचे ते एक अंग आहे अशी धारणा सर्वत्र रुजलेली आहे. या सल्ल्यावर विचार करताना दिवस कसे निघून गेले ते ज्युलीएटना कळले नाही.

शुक्रवार, २ मार्च, २०१८

अवयव प्रत्यारोपण शास्त्रातील नवे पर्व ..


मानवी शरीराची आणि शरीराच्या गरजांची, रचनेची जसजशी उकल होत चाललीय त्यातून नवनवी माहिती समोर येते आहे. तिला आधारभूत मानत त्या गरजांची पूर्तता करताना आधुनिक शरीरविज्ञानशास्त्राने नवनवी शिखरे पादाक्रांत केली आहेत. यातले सर्वात अलीकडच्या काळातील संशोधन मानवी जीवनाला नवसंजीवनी देणारे ठरणार आहे. या संशोधनाद्वारे मानवी अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेतील असंख्य प्रश्न चुटकीसरशी सुटणार आहेत. अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील ऑस्टिन  येथे झालेल्या अमेरिकन असोसिएशन फॉर द ऍडव्हान्समेंट ऑफ सायन्सच्या वार्षिक परिषदेत अवयव विकसक संशोधनावर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या पॅनलने जे रिसर्च डॉक्युमेंट सादर केले आहेत त्यातील माहिती थक्क करणारी आणि अनेक रुग्णांच्या जीवनदानाच्या आशा पल्लवित करणारी आहे. या पेपर्सनुसार मानवी अवयव आता मानवी शरीराबाहेर नैसर्गिक पद्धतीने निर्मिले जाऊ शकतील.

रविवार, २५ फेब्रुवारी, २०१८

श्रीदेवी - नीले नीले अंबर पर चांद जब आ जाये..



काल 'ती' गेल्यावर सर्वात आधी प्रतिक्रिया देणाऱ्या लोकात अमोल पालेकरांचा समावेश होता याचे अनेकांना आश्चर्य वाटेल. पण त्याला कारणही तसेच होते. लकवा मारलेल्या फुम्मन (अमोल पालेकर) या कुरूप अजागळ नवऱ्याच्या उफाड्याच्या बांध्याची षोडश वर्षीय पत्नी मेहनाची भूमिका तिने एका चित्रपटात केली होती ! १९७८ मध्ये आलेला हा चित्रपट होता 'सोलवा सांवन' ! याचे तमिळ व्हर्जन (पथीनारु वयतीनील - सोळावा श्रावण ) तिच्याच मुख्य भूमिकेने अफाट गाजले होते. त्यात रजनीकांत आणि कमल हासन होते. हिंदीत मात्र अमोल पालेकरांसोबत हीच केमिस्ट्री जुळली नाही. ती काही फारशी रूपगर्विता वगैरे नव्हती. तिचे नाक किंचित फेंदारलेले होते, ओठही काहीसे मोठे होते, वरती आलेले गोबरे गाल, कुरळे केस आणि बऱ्यापैकी सावळा रंग असा काहीसा तिचा इनिशियल लुक होता. तिचे सुरुवातीचे तेलुगु - तमिळ सिनेमे पाहिल्यावर हे लगोलग जाणवते. मात्र तिच्याकडे काही प्लस पॉइंट होते, कमालीचे बोलके डोळे, काहीसा सुस्कारे टाकल्यासारखा खर्जातला आवाज, सशक्त अभिनय आणि अत्यंत आखीव रेखीव आकर्षक देहयष्टी ! तिने स्वतःच्या रुपड्यात आमुलाग्र बदल करत 'रूप की राणीत' कधी कन्व्हर्ट केले कुणालाच कळले नाही. काल ती गेल्यावर याची जाणीव प्रकर्षाने झाली.

शनिवार, १७ फेब्रुवारी, २०१८

पीएनबी घोटाळयाची जबाबदारी कुणावर ?



१९ मे १८९४ रोजी लाहोरच्या अनारकली बाजारात मुख्य कार्यालयासह पंजाब नॅशनल बँकेची नोंदणी झाली होती. हा काळ फाळणीपूर्व भारतातला संघर्षकाळ होता. वसंत पंचमीच्या एक दिवस आधी १२ एप्रिल १८९५ रोजी बँकेची शाखा सुरू झाली. त्या काळातील भारतीय जनमानसाची छाप या संचालक मंडळावर आणि कार्यप्रणालीवर होती. संपूर्णतः भारतीयांच्या पैशाने कामाला सुरुवात करणारी ही पहिली बँक होती. सर्वधर्मसमभावाची प्रेरणा घेऊन एक शीख, एक पारसी, एक बंगाली आणि काही हिंदूंनी मिळून बँकेचा पाया रचला होता. यातही लोककल्याणाचा विचार करत बँकेचे नियंत्रण इतर शेअरधारकांकडे असावे याकरिता सात संचालकांनी अत्यंत कमी शेअर घेतले होते. या कामी महान स्वातंत्र्यसेनानी लाला लजपतराय यांच्या मार्गदर्शनाखाली पंजाबचे पहिले उद्योगपती लाला हरकिशन लाल यांनी पुढाकार घेतला होता. त्यांना ट्रिब्यूनचे संस्थापक दयालसिंह मजेठिया सुलतानचे श्रीमंत प्रभूदयाल यांच्यासह अनेक विख्यात लोकांनी स्वतःला सामील केलं होतं. या बँकेत महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री यांच्यासह जालियनवाला बाग समितीचेही खाते होते.

शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०१८

'फिल्लमबाजी'तले कललेले दिवस...



आमच्या सोलापुरात ओएसिस मॉलमध्ये नुकतेच इ-स्क्वेअरची मल्टीप्लेक्स सुरु झालीत, एकदम चकाचक. गारवा देणारी हवा, बाहेर फ्लॅशलाईटस आणि आत थोडासा अंधुक उजेड असणारया या थियेटरची तिकिटे बहुतांशी पब्लिक ऑनलाईन काढूनच थियेटरला येतं....